मालेगावी महाविद्यालयाचे टाळे तोडून कोविड सेंटरसाठी इमारत अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:59+5:302021-03-21T04:14:59+5:30
महापालिकेच्या यंत्रणेला चाव्या मिळाल्या नसल्याने पोलीस बंदोबस्तात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेशद्वाराचे व इमारतीच्या ...
महापालिकेच्या यंत्रणेला चाव्या मिळाल्या नसल्याने पोलीस बंदोबस्तात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेशद्वाराचे व इमारतीच्या खोल्यांचे टाळे तोडून इमारत ताब्यात घ्यावी लागली. उद्या, सोमवारपर्यंत कोविड सेंटर पूर्ववत सुरू होणार आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त दीपक कासार यांनी आरोग्यसेवेचा व संसर्गवाढीचा आढावा घेतला. महापालिका प्रशासनाने सेंटर पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शनिवारी मसगा महाविद्यालयाच्या प्रशासनाला इमारत अधिग्रहीत करण्याची नोटीस दिली होती. मात्र त्यांनी नोटीस नाकारली होती. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर नोटीस बजावण्यात आली. दुपारी साडेचारच्या सुमारास प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, महापालिका आयुक्त कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, महापालिकेच्या आरोग्याधिकारी सपना ठाकरे, साहाय्यक आयुक्त अनिल पारखे, कमरुद्दीन शेख, शहर अभियंता कैलास बच्छाव, आदी अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन प्राचार्य दिनेश शिरोडे यांच्याशी संपर्क साधून चाव्या मागितल्या. मात्र चाव्या उपलब्ध झाल्या नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराचे व इमारतींची टाळे तोडून इमारत अधिग्रहित केली. उद्या, सोमवारपासून या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मसगा महाविद्यालयात ७० खाटा ऑक्सिजनविरहित तर जिमखान्यातील ३६ खाटा ऑक्सिजन लाईन असलेल्या उपलब्ध होणार आहेत. याशिवाय महापालिकेने दिलावर सभागृहात ४३, हज सेंटरमध्ये ४७, सहारा रुग्णालयात २०० अशा एकूण ३९६ खाटांचे नियोजन केले आहे. सामान्य रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.. या ठिकाणी ९६ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
प्रतिक्रिया
दहावी व बारावीच्या परीक्षा शासनाने ऑफलाइन घेण्याचे निर्देश दिले आहेत. मसगा कनिष्ठ महाविद्यालयात साडेसात हजार विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल व परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी शहरात इतरत्र इमारती उपलब्ध असताना मसगा महाविद्यालयाची इमारत अधिग्रहित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. यापूर्वीदेखील कोविड सेंटरसाठी इमारत देण्यात आली होती. मात्र स्वच्छता ठेवण्यात आली नव्हती. वारंवार इमारतीची मागणी करूनही इमारत वेळेत परत केली गेली नाही. तसेच सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
- दिनेश शिरुडे
प्राचार्य, मसगा महाविद्यालय
मालेगाव कॅम्प
फोटो : २० कॅम्प
===Photopath===
200321\20nsk_44_20032021_13.jpg
===Caption===
मालेगावी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे टाळे तोडतांना महापालिकेचे कर्मचारी