स्वतंत्र सातपूर सिडको महापालिका उभारून या भागास नववैभव प्राप्त करून
By admin | Published: December 7, 2014 01:56 AM2014-12-07T01:56:20+5:302014-12-07T01:58:47+5:30
स्वतंत्र सातपूर सिडको महापालिका उभारून या भागास नववैभव प्राप्त करू
नाशिक : महापालिकेस शहराच्या इतर भागांच्या तुलनेत सातपूर, अबंड, सिडको या भागांतून तब्बल ७० टक्के निधी प्राप्त होत असतानाही हा भाग नेहमीच दुर्लक्षिला गेला आहे. स्वतंत्र सातपूर सिडको महापालिका उभारून या भागास नववैभव प्राप्त करून देण्यासंदर्भात सर्वपक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित नेतेमंडळींकडून व्यक्त करण्यात आले. त्याकरिता कृती समिती स्थापन करून सदरचा प्रस्ताव शासन दरबारी मांडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सातपूर येथील एका हॉलमध्ये नगरसेवक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सातपूर-सिडको महापालिका स्थापन करण्याची दिशा ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. यात अण्णा पाटील, माजी महापौर प्रकाश मते, माकपचे डॉ. डी. एल कराड, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, सभागृह नेता शशिकांत जाधव, नगरसेवक तानाजी जायभावे, सविता काळे, उषा शेळके, उषा बेडकोळी, उद्योजक धनंजय बेळे, भगवान आरोटे, सुधाकर जाधव, दिलीप गिरासे, शंकर पाटील, सोपान शहाणे, रमेश सांळुके, प्रकाश तांबट, दिलीप निगळ आदि उपस्थित होते.
१९८२ मध्ये स्थापन झालेल्या नाशिक महापालिकेत सातपूर, अंबड, पिंपळगाव बहुला, चुंचाळे, मोरवाडी, आनंदवल्ली, सिडको आदि भाग समाविष्ट झाला. सातपूर, अंबड या औद्योगिक वसाहतीचा समावेश झाल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात कर रूपाने तब्बल ७० टक्के भर पडली. असे असतानाही १९८२ ते ९२ ही प्रशासकीय राजवट व १९९२ ते २०१४ या ३२ वर्षांच्या सातपूर-सिडकोच्या वाट्याला काहीही आले नाही. रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांकरिता आजही या भागांमध्ये लढा द्यावा लागतो. सातपूर-सिडको भागातून महापालिकेला ३४ नगरसेवक दिले जातात. मात्र ऐवढी ताकद असतानाही एकही प्रकल्प आणला जात नसल्याची खंत सर्वच उपस्थित नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
काही मोजके राजकीय नेते वगळता एकाही नेत्याला सातपूर-सिडकोचे शहरासाठी नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. खासदारकी-आमदारकी तर एकदाही लाभली नसल्याने या भागावर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्यामुळे स्वतंत्र महानगरपालिका व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण विसरून यामागणीचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचाही ठराव यावेळी समंत करण्यात आला.
डॉ. डी. एल. कराड यांनी स्वतंत्र सातपूर-सिडको महापालिकेची मागणी करताना राजकारण बाजूला सारून कृती समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी यास दुजोरा देत कृती समितीच्या निर्णयाला समर्थन दिले. (प्रतिनिधी)