तिसऱ्या दिवशी शंभर वाहनांवर कारवाई
By admin | Published: October 28, 2015 11:36 PM2015-10-28T23:36:30+5:302015-10-28T23:37:28+5:30
परिवहन विभाग : वाहनचालकांचे समुपदेशन
नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारपासून हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे़ बुधवारी (दि़२८) धुळे महामार्ग व गंगापूर रोडवर तब्बल शंभर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ या विभागातर्फे केवळ महामार्गावरच कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी गुरुवारी कॉलेजरोडवर कारवाई केली जाणार असल्याने या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे़
जिल्ह्यात प्रतिदिन तीन नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असून हेल्मेट व सीटबेल्टचा वापर केल्यास यामध्ये निश्चितच घट येऊ शकते़; मात्र वाहनधारकांची उदासीनताच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते आहे़ विशेष म्हणजे अपघातांच्या घटना घडूनही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र आहे़सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीने हेल्मेट व सीटबेल्ट वापराचा आग्रह धरल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात मोहीम सुरू केली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने या मोहिमेचा सूर ‘सक्ती नव्हे आग्रह’ असा ठेवला असून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर कारवाई करण्यास प्राधान्य दिले जाते आहे़