१७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:28 AM2018-11-20T00:28:23+5:302018-11-20T00:28:41+5:30
वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालवितांना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७६८ रिक्षाचालकांवर सोमवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ या विशेष मोहिमेतून ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़
नाशिक : वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालवितांना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७६८ रिक्षाचालकांवर सोमवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ या विशेष मोहिमेतून ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याने तसेच उघडपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार विशेष रिक्षा तपासणी मोहीम राबविण्यात आली़ शहरातील तेरा पोलीस ठाणे हद्दीत २६ ठिकाणी नाकाबंदी करून रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली़ पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व २६० कर्मचारी, तर वाहतूक विभागाचे दहा अधिकारी व २२५ कर्मचारी या रिक्षा तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते़
या रिक्षा तपासणी मोहिमेत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाºया एक हजार ७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ तसेच कागदपत्रे तसेच फिटनेस प्रमाणपत्रे नसलेल्या ६० रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या़ पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी परिसरातील मालेगाव स्टँड व निमाणी बसस्थानक परिसरात रिक्षा तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यावेळी १८८ बेशिस्त रिक्षाचालकांकडून सुमारे ३७ हजार ६०० रुपयांचा दंडवसूल करण्यात आला. अनेक रिक्षाचालकांकडे गणवेश नसल्याने दंड करण्यात आला. तसेच काही रिक्षाचालकांकडे कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक रिक्षाचालक भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली करतात. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून वाहतुकीच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी कागदपत्रे तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले़
सिडकोत १६३ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सिडको परिसरात रिक्षा तपासणी मोहीम राबवून १६३ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली़ त्रिमूर्ती चौक, दत्त चौक परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कागदपत्र जवळ न बाळगणारे, फ्रंट सीट वाहतूक करणाºया चालकांवर कारवाई करून ३२ हजार ६०० रुपयांचा दंडवसूल केला, तर बहुतांशी रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पाळत असल्याचे दिसून आले.