नियमांची पायमल्ली करणाऱ्या ५३ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:17+5:302021-03-19T04:14:17+5:30
पंचवटी : वाढते अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहने चालविताना वाहनचालकांनी सर्व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी प्रादेशिक परिवहन ...
पंचवटी : वाढते अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहने चालविताना वाहनचालकांनी सर्व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वायुवेग पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जात असून यात प्रामुख्याने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या ५३ वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे पालन न करणे यासाठी जवळपास ४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कारवाईच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे ४ कोटी १ लाख रुपये दंड वसूल केला असून यापुढे अशीच कारवाई मोहीम सुरू राहणार आहे. तसेच रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने विविध प्रकारच्या गुन्ह्यात नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहन चालकाचे लायसन्स निलंबनासंबंधी कारवाईसाठी पोलीस ठाण्यात प्रस्ताव सादर केले जातात. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, अनुज्ञेय भार क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, वाहन चालविताना अंमली पदार्थ सेवन करणे, वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापर करणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, अशा गुन्ह्यांसाठी ९० दिवसांकरिता चालकाचे लायसन्स निलंबित करण्यात येते. कार्यालयाने केलेल्या केस पोलीस विभागाकडून प्राप्त प्रस्ताव संबंधित प्रकरणावर कार्यालयाने लायसन्स निलंबनाची प्रक्रिया होऊन २२१ लायसन्स धारकांचे लायसन्स ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.