सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:59 AM2019-09-22T01:59:22+5:302019-09-22T02:00:20+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २७ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर-ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून, शहरात कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह झोपडपट्टी दादादेखील पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत.
नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, २७ सप्टेंबरपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर-ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून, शहरात कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह झोपडपट्टी दादादेखील पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. अद्याप ९३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, १०३ गुन्हेगारांचा तडीपारीच्या प्रस्तावाची चौकशी सुरू आहे.
शहर पोलीस प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण करणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्तांशी चर्चा करून पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे आदेश दिले आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या बेकायदेशीर जुगार अड्डे, दारू विक्रीचे अड्डे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एमपीडीए कायद्यान्वये नऊ संशयितांवर कारवार्ई करण्यात आली आहे.
शहरात यापूर्वी ज्या मतदान केंद्रांवर अनुचित घटना घडल्या आहेत, ती केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष असून, संबंधित पोलीस ठाण्यांना त्या केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच स्ट्रॉँगरूम तयार करण्यात येणार असून, या स्ट्रॉँगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत १२, तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरात आठ गुन्हे दाखल झाले होते.
सोशल मीडियावर ‘सायबर’चा वॉच
निवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे शहरातील वातावरण खराब होणार नाही व कोणतेही द्वेष पसरणार नाही, याकरिता सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी सायबर व विशेष शाखेच्या पोलिसांना विविध सूचना दिल्या गेल्या असून, त्यांचा शहरातील विविध ‘व्हॉट््स अॅप ग्रुप’, फेसबूक पेज, फेसबुक वॉलवर लक्ष राहणार आहे. कुठल्याहीप्रकारचा आक्षेपार्ह मजकुराची देवाण-घेवाण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.