सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:18+5:302021-05-27T04:16:18+5:30
भंडारी डायग्नोस्टिकने १२५ शाळेजवळील मोकळ्या जागेत जैव कचरा टाकला होता. त्याची माहिती मिळताच नाशिकरोड येथील विभागीय स्वच्छता निरीक्षक ...
भंडारी डायग्नोस्टिकने १२५ शाळेजवळील मोकळ्या जागेत जैव कचरा टाकला होता. त्याची माहिती मिळताच नाशिकरोड येथील विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, विजय मोरे, सागर बारगळ, स्वच्छता मुकादम विजय बहेनवाल, पूजा परदेशी, संजय चव्हाण, संजय काळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दंडात्मक कारवाई केली.
लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी असताना जेलरोडच्या भीमनगर येथील फोटो स्टुडिओ सुरू होता. त्यामुळे त्याच्या संचालकाला महापालिका पथकाने पाच हजारांचा दंड केला. जेलरोड येथील पाच चिकन दुकानदारांनी उरलेले शिळे चिकन सार्वजनिक ठिकाणी फेकून दिले होते. नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करताच चिकन विक्रेत्यांना सर्वांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अन्य प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नाशिकरोड येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची मोहीम सुरू असून चार नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये असा एकूण दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. बेशिस्त नागरिक, व्यावसायिक यांच्याविरुध्द कारवाईची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मनपा विभागीय अधिकारी संजय गोसावी यांनी दिली.