मालेगावी प्लॅस्टिक कारखान्यांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:41 AM2018-05-08T01:41:32+5:302018-05-08T01:41:32+5:30
शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच संबंधित कारखाना मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त राजू खैरनार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालेगाव : शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच संबंधित कारखाना मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त राजू खैरनार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना आग लागत आहेत. या आगींच्या घटनांमध्ये नागरी वसाहतीला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील १२५ प्लॅस्टिक कारखानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच या बेकायदेशीर कारखान्यांवर प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, असे पत्र देण्यात आले आहे. २०१६ साली ७८ प्लॅस्टिक पाइप गिट्टी कारखान्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या आगींच्या घटनांच्या वाढीमुळे प्रभाग अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील कारखाने व गुदामांची पाहणी करून स्थळ निरीक्षण अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारपासून पोलिसांच्या मदतीने चारही प्रभागात ही कारवाई केली जाणार आहे. तसेच शासनाच्या प्लॅस्टिकबंदी अध्यादेशाप्रमाणे प्लॅस्टिक वाहतूक, आयात, पुनर्निमिती करणाºयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात येणार आहे. या अध्यादेशाचे उल्लंघन केल्यास पहिला दंड पाच हजार, दुसरा दहा व तिसरा पंचवीस हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अक्सा कॉलनी व स्टार हॉटेलच्या पाठीमागे लागलेल्या आगीच्या घटनेतील मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे तसेच प्लॅस्टिक कारखाने व गुदामांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहेत. तसेच १९८८ व्यवसाय व आस्थापनाधारकांना फायर आॅडिटची नोटीस बजावण्यात आली आहे. जैविक कचरा टाकल्यास मनपा आयुक्तांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश वॉटरग्रेस कंपनीकडून सध्या शहरात जैविक कचरा उचलला जातो; मात्र खासगी डॉक्टरांनी ठेकेदार बदलण्याची मागणी केली आहे. खासगी डॉक्टर व रुग्णालयांनी उघड्यावर व महापालिकेच्या कचराकुंड्यांमध्ये जैविक कचरा टाकल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहे.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील २७ लहान-मोठ्या नाल्यांची साफसफाईचे काम हाती घेतले आहे. जाफरनगर, कालीकुट्टी, डेपो परिसरातील नाले सफाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी चार जेसीबी, सहा स्वच्छता निरीक्षक व १८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोसम नदी किनाºयावरील झोपडपट्टीधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहे.