संचारबंदीत दोनशेहून अधिक लोकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:49+5:302021-04-16T04:14:49+5:30
--- नाशिक : संचारबंदीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १२ लोकांसह विनामास्क ...
---
नाशिक : संचारबंदीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १२ लोकांसह विनामास्क वावरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आणि तीन आस्थापनांचा समावेश आहे. या कारवाईत एक लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला असून नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये बुधवारी (दि.१४) रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील तेराही पोलीस ठाणेअंतर्गंत संचारबंदीची तयारी सुरू असतांनाच अनेकांनी घराबाहेर पडत नियमांचे उल्लंघन केले. दिवसभरात पोलिसांनी अशा बेफिकीर लोकांना हुडकून काढत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १५८ विनामास्क फिरणारे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर कारवाई करीत पोलिसांनी सात हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात सरकारवाडा हद्दीतील दोन आणि मुंबईनाका हद्दीतील एका आस्थापनेवर वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार असा तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका थुंकीबहाद्दरास एक हजार रुपयांचा दंड़ ठोठावण्यात आला आहे. रात्री संचारबंदी लागू होताच १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांकडून ११ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१ जणांवर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असून नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये अन्यथा पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
..........