नाशिक महापालिकेकडून रस्त्यांवरील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 07:34 PM2018-02-15T19:34:45+5:302018-02-15T19:35:45+5:30
आयुक्तांचे आदेश : सातपूरमध्ये मोहीम, ७ ट्रक माल जप्त
नाशिक - महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा तयार केला असून त्यानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असून रस्त्यावर भाजीविक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबविण्याच्याही सूचना अतिक्रमण विभागाला देण्यात आल्या आहेत. या आदेशानंतर, गुरुवारी (दि.१५) सातपूर येथील छत्रपती शिवाजी भाजी मंडई तसेच मंडई पार्कींगमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणा-या भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने हटवले. यावेळी, पथकाने विक्रेत्यांकडून सुमारे ७ ट्रक विविध प्रकारचे साहित्य जप्त केले.
महापालिकेने हॉकर्स झोन निश्चित करत त्याची काही विभागात अंमलबजावणीही सुरू केली आहे. परंतु, विक्रेत्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अंमलबजावणीत अडथळे उत्पन्न होत आहेत. याशिवाय, प्रस्तावित हॉकर्स झोनला फेरीवाला संघटनांनी विरोधही दर्शविला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर हॉकर्स झोनच्या आराखड्याची माहिती घेतली. त्यानंतर, हॉकर्स झोननुसार कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. याशिवाय, यापुढे भाजीमंडई तसेच विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागांवरच भाजीविक्रेत्यांनी व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्याविरूद्ध कठोर पावले उचलत अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. त्यानुसार, गुरूवारी (दि.१५) अतिक्रमण विभागाने सातपूर विभागातील छत्रपती शिवाजी भाजी मंडई, तसेच शिवाजी मंडई पार्कींग मधील विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई केली तसेच सातपूर कमानी पासून ते मारुती मंदिरापावेतो रस्त्यावर व रस्त्यालगत अतिक्रमणे करुन बसणारे भाजीविक्रते, फळविक्रते व इतर तत्सम व्यावसायिक यांना हटविले. यावेळी पथकाने आक्रमक भूमिका घेत भाजीपाला, फळभाज्यांसह विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली.