सिडकोत ६० वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:31 PM2020-04-04T17:31:26+5:302020-04-04T17:33:47+5:30
सिडको व अंबड भागात नियमांचे उल्लंघन करीत अनेक नागरिक बाहेर पडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू असून, या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही सिडको व अंबड भागात नियमांचे उल्लंघन करीत अनेक नागरिक बाहेर पडत आहेत. यामुळे अंबड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारित २०हून अधिक दुचाकी वाहने जप्त केली असून, ६० वाहनधारकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे.
अंबड पोलिसांनी सिडकोतील मुख्य रस्त्यांसह अंबड भागातील अनेक भागांत नाकाबंदी केली आहे. संचारबंदी असतानाही कारण नसताना अनेक नागरिक वाहनांचा वापर करीत रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यंत्रणा कमी पडत आहेत. शासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा असताना नागरिकच नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नागरिकांची वाहनेच जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.