दोन्ही शिक्षकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:30 AM2019-08-15T01:30:01+5:302019-08-15T01:30:24+5:30
शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे.
नाशिक : शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे.
गेल्या ३१ जुलै रोजी ही घटना घडली होती. महापालिकेच्या काळेनगर येथील शाळेतील विद्यार्थी अक्षय साठे हा लघुशंकेसाठी बाहेर गेला. याठिकाणी एका घराचे बांधकाम सुरू होते. यामुळे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते त्यात बुडून अक्षय या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीदेखील केली होती. त्यानुसार महापालिकेने शाळेचे मुख्याध्यापक कैलास ठाकरे तसेच शिक्षिका मंदा महारू बागुल यांना नोटिसा बजावून त्यांचा खुलासा मागवला होता. आता या शिक्षकांनी सादर केलेले खुलासे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना प्राप्त झाले आहेत. तथापि, शिक्षण मंडळाने ते अमान्य केले आहेत. कैलास ठाकरे यांनी, शाळा खूप मोठी असल्याने सर्वच ठिकाणी नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे खुलाशात नमूद केले आहे. तर शिक्षिकेने सदरचा मुलगा लघुशंकेसाठी वर्गाबाहेर पडल्याचे नमूद केले असले तरी मुळातच शाळेत प्रसाधनगृह असताना मुलगा बाहेर लघुशंकेसाठी शाळाबाहेर कसा काय पडू शकेल? असा प्रश्न मनपाच्या शिक्षण विभागाला पडला आहे. त्यामुळे त्यांचा खुलासादेखील अमान्य करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव आता पुढील कार्यवाहीसाठी लेखापरीक्षकांकडे देण्यात आला असून, चौकशीची पुढील कायवाही होणार आहे. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी शाळेची असते. त्यामुळे महापालिकेने हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचे देवीदास महाजन यांनी सांगितले.
शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्द
शहरातील गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमधील सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भातील अहवाल संबंधित शाळेने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केला आहे. हा अहवाल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या शाळेत सातवीच्या वर्गात ठेवलेले कपाट पडून त्याखाली दबून एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात, मनपाच्या शिक्षण प्रशासनाने अहवाल मागवला होता.