अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात सर्व पक्षीय हॉकर्स कृती समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:46 PM2018-04-03T15:46:23+5:302018-04-03T15:46:23+5:30
बी. डी. भालेकर मैदानावरून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला. शालीमार चौक, शिवाजी रोडने मध्यवर्ती बस स्थानक चौक व तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी नाशिक महापालिका व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नाशिक : शहरातील बेरोजगार व गोरगरिब हॉकर्स, टपरीधारकांविरूद्ध महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात सर्व पक्षीय हॉकर्स कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राष्टÑीय फेरीवाला धोरणाची अंमबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी मोर्चेक-यांनी केल्या.
बी. डी. भालेकर मैदानावरून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला. शालीमार चौक, शिवाजी रोडने मध्यवर्ती बस स्थानक चौक व तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी नाशिक महापालिका व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील भाजपा सरकारने मुद्दाम स्थानिक भुमीपूत्रांना बेघर व बेरोजगार करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघर, बेरोजगार शोषीत, पिडीत, अपंग, गोरगरिब, दलीत, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाला त्रास देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असून, हॉकर्स, टपरीधारकांना उद्धवस्त करून रोजीरोटीपासून वंचित केले जात आहे. आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून त्यांनी बदली सत्र नावाखाली महापालिकेतील मागासवर्गीय कामगारांच्या जाणिवपुर्वक बदल्या करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे काम सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून शहरातील शेकडो हॉकर्स, टपरीधारकांचा लाखो रूपयांचा माल जप्त करून ठेवला आहे तो त्वरीत परत करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांची चौकरी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, नाशिक मधील ३५ ते ४० वर्षापुर्वीच्या झोपड्यांचे सर्व्हेक्षण करून त्यांचे आहे त्याच जागेवर पुनवर्सन करण्यात यावे व महापालिकेने त्यांना नागरी सुविधा पुरवाव्यात व एकतर्फी राबविण्यात येत असलेली अतिक्रमण मोहिम त्वरीत थांबविण्यात यावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. याआंदोलनात पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे, हॉकर्स सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोर, पुष्पा वानखेडे, मुरली घोरपडे, सिताबाई भागकाडे, सुनिता कर्डक, देविदास डोके, इमरान शेख यांच्यासह शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते.