नियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:33 AM2018-08-20T01:33:00+5:302018-08-20T01:33:26+5:30
यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
नाशिक : यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. मंडप उभारणी, ध्वनिप्रदूषणासह अन्य नियमावलींचे पालन न केल्यास संबंधित मंडळावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी गणेश मंडळांच्या बैठकीत नाशिक शहरासाठी स्वतंत्र गणेशोत्सव महामंडळ स्थापन करतानाच प्रशासनाच्या जाचक नियमावलीस कडाडून विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने रस्त्यात मंडप बांधू दिले नाहीत, तर खांबांवर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरची नियमावली ही स्थानिक प्रशासनाने तयार केलेली नसून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने नियम तयार केले आहेत. नियमांचा भंग झाल्यास आयुक्तांना अटक करण्यापर्यंत कारवाई होऊ शकते, त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.