कारवाई : शहर पोलीस स्टेशन व नगरपरिषद यांची संयुक्त मोहीम
By admin | Published: January 11, 2015 11:03 PM2015-01-11T23:03:30+5:302015-01-11T23:03:50+5:30
येवल्यात मांजाविक्रेत्यांवर छापे
येवला : शहरात नायलॉन मांजा साठवणूक व विक्र ीस बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शहरात कापडबाजार, थिएटर रोड, देवी खुंट, नागड दरवाजा, बुन्देलपुरा भागात सर्व पतंग व मांजा विक्रेत्यांच्या दुकानांवर अचानक छापे टाकले.
दुकानांची कसून तपासणी करण्यात आली. नायलॉन धागा कोठेही आढळला नसला, तरी धाब्यावर पतंग उडविणाऱ्या मुलांच्या हातात मात्र नायलॉन धागा दिसत आहे. धाब्यावर जाऊन पथक कारवाई करणार काय, हा खरा प्रश्न आहे.
मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवसांत शहरात पतंगोत्सव साजरा केला जातो. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. नायलॉन दोरा हा मजबूत असल्यामुळे होणाऱ्या शारीरिक इजा गंभीर स्वरूपाच्या असतात, जसे गळा कापणे, हात कापणे, पक्ष्याचा बळी जाणे वगैरे. परिणामी धाग्याचे दुष्परिणाम लक्षात घेता दुकानात नायलॉन दोरा विकण्यास ठेवू नये अगर विक्री करू नये याबाबत सर्व विक्रेत्यांना पथकातर्फे सूचना देण्यात
आल्या.
जर कोणी आढळून आले तर त्वरित येवला नगरपरिषदेस वा शहर पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी आर. आय. शेख व पोलीस उपनिरीक्षक एस. आर. बैरागी यांनी केले. नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोहिमेत स्वच्छता विभागाकडील कनिष्ठ अभियंता सत्यवान गायकवाड, स्वच्छता निरीक्षक सुनील संसारे, कैलास बाकळे, नंदू घोगे, अर्जुन माळी तसेच पोलीस स्टेशनचे सी. एम. बागुल, एम. एच शेख व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)