लभंगार बाजारावर आता बंदोबस्तानंतर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:40 AM2017-10-06T00:40:56+5:302017-10-06T00:41:03+5:30
अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा बाजार वसू लागला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच भंगार बाजार हटविण्याची कारवाई शक्य असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले.
नाशिक : अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा बाजार वसू लागला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच भंगार बाजार हटविण्याची कारवाई शक्य असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याने, त्याबाबत कायदेशीर मत मागविण्यात आले आहे.
महापालिकेने बहुचर्चित भंगार बाजार हटविण्याची ऐतिहासिक कामगिरी जानेवारी २०१७ मध्ये केली होती. मात्र, पुन्हा भंगार बाजार वसणार नाही, याकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. भंगार बाजार वसत असताना त्यावर तातडीने कारवाई झाली असती तर पुन्हा एकदा भंगार बाजार पसरला नसता. दरम्यान, भंगार बाजार व्यावसायिकांनी महापालिकेच्या कारवाईविरुद्ध पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तर मनपा प्रशासनाने भंगार बाजारावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाला पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केलेली आहे. परंतु, सण-उत्सवाची कारणे देत पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे भंगार बाजारावरील कारवाई रखडली आहे.