गर्भपातप्रकरणी कारवाई
By admin | Published: February 21, 2017 12:47 AM2017-02-21T00:47:09+5:302017-02-21T00:47:22+5:30
गुन्हा दाखल : मनपाच्या पथकाकडून शिंदे हॉस्पिटल सील
नाशिक : बेकायदेशिपणे गर्भलिंगनिदान करत महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी मुंबईनाका येथील शिंदे हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम निंबा शिंदे यांच्याविरुद्ध महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून शिंदे हॉस्पिटल सील केले असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, डॉ. बी. एन. शिंदे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने २५ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. डेकाटे यांनी सांगितले, मनपाचे वैद्यकीय तपासणी पथकाने शिंदे हॉस्पिटलची तपासणी केली असता, सदर हॉस्पिटल हे नर्सिंग होम अॅक्टनुसार नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले. विनापरवाना हॉस्पिटल चालविले जाऊन त्याठिकाणी शस्त्रक्रियाही होत असल्याचे उपलब्ध साधनसामुग्रीवरुन लक्षात आले. पथकाला गर्भपात केलेली सदर महिला रुग्णही त्याठिकाणी उपचार घेताना आढळून आली. यावेळी हॉस्पिटलचे डॉ. शिंदे यांचेसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याशिवाय, पथकाने या महिलेवर उपचार करणारे डॉ. विजय थोरात, भूलतज्ज्ञ डॉ. विजय पिचा,डॉ. सचिन जाधव यांचीही चौकशी करुन जाबजबाब नोंदविले आहेत. यावेळी मुंबई नाका पोलिसांचीही मदत घेण्यात आली. डॉ़ शिंदे यांनी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही़ तसेच त्यांच्या वैद्यकीय पदव्यांबाबतही महापालिकेच्या पथकाला शंका आहे़ या प्रकरणी महिला रुग्णाच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले असून रुग्ण महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून पोलिसांनी डॉ. शिंदे यांना अटक केली आहे.
दरम्यान, सदर डॉक्टरच्या ओझर येथील हॉस्पिटलचीही चौकशी करण्याची मागणी डेकाटे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)