पक्षाचे चिन्ह लावणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई
By admin | Published: February 10, 2017 01:29 PM2017-02-10T13:29:22+5:302017-02-10T13:29:22+5:30
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून,
नाशिक : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, या कालावधीत खासगी वाहनांवर विनापरवानगी राजकीय पक्षाचे चिन्ह लावून दिमाखात मिरविणाऱ्या वाहनचालकांवर गुरुवारी (दि़९) सायंकाळी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली़ पोलिसांनी परिमंडळ दोनमध्ये तीन ठिकाणी नाकाबंदी करून केलेल्या या कारवाईमुळे अनेक वाहनधारकांनी आपल्या वाहनावरील स्टिकर्स काढून टाकणे पसंत केले़ नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, इच्छुक व त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत़ त्यातच काही कार्यकर्त्यांनी आपल्या खासगी वाहनांवर विनापरवानगी राजकीय पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचा फोटो लावला असून, प्रचार सुरू आहे़ परिमंडळ दोनमध्ये करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान या वाहनांची तपासणी केली असता विनापरवानगी स्टिकर्स लावल्याचे समोर आले़ पोलिसांनी या खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे़ या कारवाईचा धसका घेत अनेक चारचाकी वाहनधारकांनी लावलेले पोस्टर्स, उमेदवाराचे फोटो, तसेच पक्षचिन्ह स्वत:हून काढून घेतले आहे़ या नंतर पोलिसांनी आपला मोर्चा टवाळखोरांकडे वळविला़ तसेच परिसरातील हॉटेल व लॉजचीही तपासणी केली़ (प्रतिनिधी)