नाशकात सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई, २१ अनधिकृत बांधकामे हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 07:42 PM2017-11-09T19:42:45+5:302017-11-09T19:45:44+5:30
किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत
सातपूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. दरम्यान, महापालिकेच्या या मोहिमेमुळे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी पंचवटी, नाशिक पूर्व विभागातील काही विश्वस्तांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.८) सिडको विभागापासून महानगरपालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी (दि.९) सातपूर विभागात सकाळी ९ वाजता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मोहीम सुरू करण्यापूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात मोहिमेतील पोलिसांचा फौजफाटा हजर झाला. महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोहिमेचा आराखडा तयार केला. सुरुवातीला पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याच्या कडेला असणारी दोन धार्मिक स्थळे हटवून ही मोहीम महादेववाडीत गेली. तेथील दोन धार्मिक स्थळे हटविण्यात आली. त्यानंतर सातपूर कॉलनीत श्री छत्रपती विद्यालयालगतची तीन धार्मिक स्थळे, श्री सप्तशृंगी मंदिराजवळील दोन धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई पार पाडण्यात आली. जुन्या कॉलनीतील दोन धार्मिक स्थळे आणि श्रमिकनगर येथील एक धार्मिक स्थळ अशी एकूण १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. धार्मिक स्थळांमधील मूर्ती काढण्यापूर्वी पुरोहिताच्या माध्यमातून विधिवत पूजन करून घेण्यात आले. त्यानंतर मूर्ती संबंधितांच्या हवाली करण्यात आली. दोन-तीन ठिकाणी झाडाखाली देवदेवतांच्या फोटोफ्रेम ठेवण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा मोहीमेदरम्यान काढून घेण्यात आल्या.
बहुतांश धार्मिक स्थळे हटविण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून सहकार्य केले. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम शांततेत पार पडली.