75 वाहनधारकांवर आरटीओची कारवाई
By admin | Published: December 15, 2015 12:19 AM2015-12-15T00:19:37+5:302015-12-15T00:19:51+5:30
75 वाहनधारकांवर आरटीओची कारवाई
नाशिक : रस्ते अपघाताला आळा बसवा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम साधारणत: महिनाभरापूर्वी सुरू केली होती़ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवार (दि़१४)पासून सुरुवात झाली़ मोहिमेच्या पहिल्या दिवशी ७२ दुचाकीचालक व तीन कारचालकांवर कारवाई करण्यात आली़
प्रादेशिक परिवहन विभागाने गत महिन्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली होती़ या मोहिमेच्या दुसरा टप्प्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, १८ डिसेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे़ सोमवारी (दि़ १४) नाशिक-पेठ व नाशिक-मुंबई रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली़ मंगळवार (दि़ १५) नाशिक-दिंडोरी व नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड, बुधवारी (दि़१६) नाशिक-धुळे व नाशिक-गंगापूर रोड, गुरु वारी (दि़ १७) नाशिक-औरंगाबाद व कॉलेजरोड तर शुक्र वारी (दि़ १८) नाशिक-पुणे रोड व उंटवाडी, सिडको रोड या रस्त्यावर वाहन तपासणी करण्यात येणार आहे.
आरटीओतर्फे राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील वाहन तपासणीत ९३६ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, तर ४५० नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले होते़ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कारवाई करण्यात येणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईबरोबरच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी समुपदेशनासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)