पंचवटीत दुसऱ्या दिवशीही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:27 PM2021-03-18T22:27:29+5:302021-03-19T01:24:24+5:30
पंचवटी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात महापालिका व पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी नेऊन दंड वसूल केला.

बुधवारपासून मनपा व पंचवटी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमाराला पोलीस निरीक्षक अशोक भगत, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, किरण मारू आदींसह पोलिस, मनपा पथकाने दिंडोरीनाका, पेठरोड, पंचवटी कारंजा तसेच आरटीओ सिग्नल परिसरात मोहीम राबविली. वाहनावरून जाताना मास्क न लावलेल्या नागरिकांना थांबवून त्यांना लगेच पोलीस वाहनात बसवून मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी नेले तर काहींना जागेवरच २०० रुपये दंड करण्यात आला. नागरिक जोपर्यंत नियमांचे पालन करणार नाहीत, तोपर्यंत नागरिकांची धरपकड करून त्यांची कोरोना चाचणी तपासणी करण्याबरोबर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.