वॉरंट रद्द असतानाही अटकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 05:05 PM2019-06-14T17:05:28+5:302019-06-14T17:05:46+5:30
शिवडीच्या शेतकऱ्याला असाही पोलीसी खाक्या
लासलगाव : न्यायालयाने अजामिनपात्र अटक वॉरंटचा आदेश रद्द करुनही निफाडच्या पोलिसांनी शिवडी येथील शेतक-याला अटक करत त्याला पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांच्या या अजब कृतीमुळे संबंधित शेतक-याला मात्र नाहक मनस्ताप भोगावी लागला आहे तर निफाड पोलिसांच्या एकूणच कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबतची माहिती अशी की, निफाड न्यायालयात मोटार वाहन अपघात खटल्यात गैरहजर राहिल्याने बाबाजी बबन क्षीरसागर या शेतकऱ्यांविरूद्ध न्यायालयाने अजामिनपात्र अटक वॉरंट काढले होते मात्र आईच्या प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयात हजर राहता आले नसल्याने सदरचे वॉरंट रद्द करणेसाठी त्यांनी न्यायालयास विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने बाबाजी क्षीरसागर यांचे अटक वॉरंट दि. १० मे रोजी शंभर रु पयांचा दंड आकारत रद्द करण्याचा आदेश केला. सदर दंड भरल्याची पावती क्षीरसागर यांनी निफाड पोलिसांनाही दिली होती. तरीही दि. १३ जून रोजी निफाड पोलिसांनी बाबाजी क्षीरसागर यांना न्यायालयाचे अटक वॉरंट असल्याचे सांगत अटकेची कारवाई केली. याबाबत बाबाजी क्षीरसागर यांनी वॉरंट रद्द केल्याची माहिती देऊनही पोलिसी खाक्यापुढे त्यांचे काही चालले नाही. पोलिसांनी त्यांना अटक करु न न्यायालयात हजर केले असता अटक वॉरंटच रद्द असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पुन्हा बाबजी क्षीरसागर यांना न्यायालयात अर्ज देऊन जामीनावर स्वत:ची सुटका करु न घ्यावी लागली. मात्र या कालावधीत बाबाजी क्षीरसागर यांना अटक करु न पोलिस कारवाई केल्याने विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. निफाड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मात्र चर्चेला उधाण आले आहे.