विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:42 AM2019-03-19T01:42:37+5:302019-03-19T01:42:53+5:30
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी अथवा समर्थकांनी विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.
नाशिक : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी अथवा समर्थकांनी विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.
या संदर्भात आदेश जारी करण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, निवडणुकीच्या रिंगणात असलेले राजकीय पक्ष, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यामुळे ध्वनिप्रदूषण होऊन सर्वसामान्य लोकांच्या शांततेस व स्वास्थ्याला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचे कालावधीत ध्वनिक्षेपकाचे वापरावर निर्बंध घालण्याची आवश्यकता असून, त्यासाठी निवडणूक प्रचारासाठी नाशिक जिल्ह्णात ध्वनिक्षेपकाचा वापर संबंधित पोलीस विभागाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत कोणत्याही क्षेत्रात फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपणाचा वापर करता येणार नाही.
सर्व राजकीय पक्ष, उमदेवार व इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करावा व त्यासंबंधी अशा ध्वनिक्षेपकाचे वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात असून, सदर आदेशााची अंमल बजावणी मंगळवार, दि. १९ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.