निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:12 AM2018-09-20T01:12:30+5:302018-09-20T01:13:16+5:30
मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला.
नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात रूरबन मिशन अंतर्गत दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांची आढावा बैठक भुसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ग्रामसेवकांनी मिशन रूरबन मिशन अंतर्गत कामाचा प्राधान्याने पाठपुरावा करून वेळेत काम होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने कामांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. आयआयटी सल्लागार नेमून चांगल्या दर्जाची कामे कशी होतील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
दाभाडी क्लस्टर अंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचा आराखडा येत्या आठ दिवसांत सादर करण्यात यावा, पर्यावरणपूरक शौचायलयांचे मॉडेल अभ्यासून त्यानुसार शौचालयांचे युनिट उभारण्यात यावे, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व कामे वेळेत होतील रस्त्यांची सर्व कामे नियोजित वेळेत होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. क्लस्टरमधील पददिवे नसलेल्या गावांचा समावेश रूरबन योजनेंतर्गत करण्यात यावा, कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, ठिबक सिंचनासाठी अधिकाधिक शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात येऊन ग्रामपंचायतीचे नवे कार्यालय उभारण्याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.