सातपूरला कारवाई : रहिवासी भागातील मोठी कारवाई पक्क्या घरांचे बांधकाम जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:46 AM2018-05-09T00:46:41+5:302018-05-09T00:46:41+5:30
सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी (दि.८) धडक मोहीम राबवित पोलीस बंदोबस्तात सातपूर कॉलनीतील सुमारे १२ घरांचे पक्के वाढीव बांधकाम हटविण्याची कारवाई केली.
सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी (दि.८) धडक मोहीम राबवित पोलीस बंदोबस्तात सातपूर कॉलनीतील सुमारे १२ घरांचे पक्के वाढीव बांधकाम हटविण्याची कारवाई केली. सातपूर परिसरात रहिवासी भागातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगरमध्ये नागरिकांच्या तक्रारींवरून आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचा ताफा पोलीस बंदोबस्तात श्रीकृष्णनगरात दाखल झाला. या मोहिमेचे नेतृत्व विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले. श्रीकृष्णनगरातील रहिवाशांनी आपल्या घरापुढे बांधलेली पक्की आरसीसी बांधकामे पोलीस बंदोबस्तात जेसीबीने हटविण्यात आली. काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी अगोदर कळविले नाही म्हणून वेळ मागितला. परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावत कारवाई पूर्ण केली. यातील बहुतांश नागरिकांनी सुसज्ज असे बांधकाम केलेले होते. तर काहींचे बांधकाम खूप जुने होते. रहिवासी भागात जाऊन धडक कारवाई करण्याची ही पहिलीच कारवाई मानली जात आहे. या कारवाईत महानगरपालिकेच्या सातपूर, सिडको आणि पूर्व नाशिक विभागातील ३० कर्मचारी आणि नगररचना विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मोहीम सुरू होती.
आपापसातील वाद
आपापसातील वादामुळे शेजाºयांनी दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागात वाढीव बांधकामाचे लेखी तक्र ार केली होती. यापूर्वी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मोहीम राबविण्यापूर्वी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वाढीव बांधकामाची पाहणी केली होती. त्यानंतरच ही मोहीम राबविण्यात आली. वाढीव बांधकामे पाडत असताना काहींनी हळहळ व्यक्त केली तर काहींनी समाधान व्यक्त केले. आपापसातील वादामुळे नाहक नुकसान झाल्याची चर्चाही उपस्थितांमध्ये रंगली होती.