साडेतीन हजार लोकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:45 PM2020-04-24T22:45:38+5:302020-04-24T23:44:12+5:30
नाशिक : लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसून, त्यातच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, ते पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, महिनभरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ हजार ४४७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.
नाशिक : लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसून, त्यातच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, ते पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, महिनभरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ हजार ४४७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा १३० वर पोहोचला आहे. यापैकी ११ रुग्ण दगावले आहेत. एकूण ३२८ कोरोना संशयित रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, झाकीर हुसेन रुग्णालय, सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचारासाठी दाखल आहेत. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी १० ते दुपारी ४ अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे, अत्यावश्यक गरजेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र नागरिक याकडे सपशेल दुर्लक्ष करून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य सर्रासपणे भाजीपाला, किराणा खरेदीसाठी बाहेर फिरताना आढळून येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ मार्चपासून अद्याप १ हजार ५३९ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ३ हजार ४४७ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-------
१ हजार ९५० दुचाकी जप्त
नागरिकांनी सर्रासपणे रस्त्यांवर दुचाकीने संचार करू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून रस्ता बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिक दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर येत असल्याने अशा लोकांच्या दुचाकी पुढील तीन महिन्यांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अद्याप १ हजार ९५० दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीत जप्त केल्या गेल्या आहेत.