अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:54 AM2019-04-16T00:54:16+5:302019-04-16T00:54:33+5:30
स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.
नाशिक : स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.
शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानचे हाती घेतलेले काम वर्र्ष-दीड वर्षापासून सुरूच आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भागात दुकाने आणि शाळा आहेच, परंतु त्याचबरोबर हे रहिवासी क्षेत्रदेखील आहे, परंतु या नागरिकांना काय अडचणी येऊ शकतात हेदेखील समजून नियोजन केलेले नाही. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा रस्ता घोळात आहे. परंतु त्यावर शहरातील नेते आणि राजकीय पक्ष आवाज उठवत नाहीत. या भागातील रस्त्यावरील दुकानात जायचे असेल तर लोकांना दुचाकी कोठे उभ्या करायच्या असा प्रश्न निर्माण होतो. येथील एखाद्या दुकानात जाण्यासाठी दोन मिनिटे गाडी उभी केली की टोइंग करणारी गाडी येते आणि गाडी घेऊन जाते. संबंधितांना विनंती करून दंड भरण्याची तयारी दर्शविली तरी गाडी सोडली जात नाही. इतकी वाहतूक शिस्त दाखवली जाते आणि दुसरीकडे मात्र याच ठिकाणी रिक्षा आणि अन्य मोठी प्रवासी वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत असतो. परंतु त्यांच्यावर मात्र कोणीही कारवाई करीत नाही. मुळात हा त्रास दूर करण्यासाठी एक तर रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. परंतु अनेक महापालिका आयुक्त येऊन गेले तरी रस्ता कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगू शकत नाही, हा विचित्र प्रकार आहे.
किमान परिस्थितीचा तरी विचार करावा
वर्ष-दीड वर्षापासून स्मार्ट रोडचा विषय गाजत आहे, परंतु हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेही वाहने उभी करावी लागतात. किमान त्याचा विचार करून तरी वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी किंवा नाही याचा विचार करावा.