गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: August 6, 2016 01:07 AM2016-08-06T01:07:09+5:302016-08-06T01:07:25+5:30
मोक्कान्वये कारवाई : पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन
पंचवटी : परिसरात दहशत निर्माण करणे, तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई केली असून, मोक्कातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मोक्कान्वये कारवाई केलेल्या गुन्हेगारांबाबत कोणाला काही तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी केले आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, गावठी कट्टा बाळगणे, दंगल घडवून आणणे आदि गुन्ह्यात सहभाग तसेच हनुमानवाडीतील वाघ बंधूंवर जीवघेणा हल्ला चढवून सुनील वाघ याची हत्त्या घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी जवळपास २१ संशयितांवर मोक्का लावला आहे. त्यात तीन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. मोक्कान्वये पोलिसांनी परदेशी टोळीचा सूत्रधार कुंदन परदेशी, अजय जेठा बोरीसा, अक्षय इंगळे, करन परदेशी, आकाश जाधव, मयूर कानडे, मयूर भावसार, श्रीनिवास कानडे आदि संशयितांना अटक केली होती, तर मोक्कातील आरोपींना सर्वच प्रकारची मदत केल्याच्या कारणावरून अजय बागुल
याला ताब्यात घेऊन त्याच्यावरही मोक्का लावण्यात आला होता. मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांबाबत कोणाला तक्रार करायची असल्यास त्यांनी म्हसरूळ येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी एका पत्रकान्वये केले आहे. मोक्कातील आरोपींबाबत तक्रार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार आहेत. (वार्ताहर)