नियमभंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Published: October 21, 2016 02:04 AM2016-10-21T02:04:55+5:302016-10-21T02:12:00+5:30

गाळ्यांची होणार तपासणी : ३४५ गाळ्यांना पोलिसांची परवानगी

Action on the violating crackers | नियमभंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई

नियमभंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई

Next

 नाशिक : दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही महापालिकेकडून फटाके विक्रीसाठी गाळ्यांची लिलावप्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी शहरात ३४५ गाळे उभारणीस परवानगी दिली आहे. मात्र, विस्फोटक विनियम व नियमांचा भंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फतही ना हरकत दाखले नाकारण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे महापालिकेने शहरातील मोकळ्या जागांची यादी करत ती फटाके विके्रत्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार प्रारंभी पोलिसांनी २६१ पैकी २५८ गाळ्यांना परवानगी दिली तर नाशिक-पुणे रस्त्यावरील पौर्णिमा स्टॉपजवळील तीन गाळ्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर फटाके विक्रेत्यांकडून जागा मागणी वाढल्याने महापालिकेने आणखी ११७ जागांची निश्चिती करत परवानगी मागितली असता पोलिसांनी ३० गाळ्यांना परवानगी नाकारली.
महापालिकेकडून आता एकूण ३४५ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबविली जात असून, गेल्या बुधवारी इदगाह मैदानावरील गाळ्यांचे लिलाव करण्यात आले. त्यातील ४० गाळे अद्यापही शिल्लक असल्याने त्याबाबतचे लिलाव शुक्रवारी (दि.२१) काढण्यात येणार आहेत तर नव्याने परवानगी मिळालेल्या ८७ गाळ्यांचा लिलाव येत्या सोमवारी (दि.२४) करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरात विनापरवाना फटाक्यांचे गाळे उभारणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांमार्फत कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
त्याचबरोबर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फतही गाळ्यांची तपासणी करूनच ‘ना हरकत दाखला’ दिला जाणार आहे. विस्फोटक नियमातील तरतुदींनुसार, दोन गाळ्यांमध्ये १० फुटाचे अंतर असले पाहिजे, गाळ्यांची उभारणी करताना प्लॅस्टिक किंवा कापडांचा वापर न करता पत्र्याचेच शेड उभारण्यात यावेत आणि दोन गाळ्यांचे प्रवेशद्वार हे समोरासमोर न ठेवता ते विरुद्ध दिशेला असले पाहिजे, आदि नियमांची काटेकोर तपासणी केली जाणार असून, नियमभंग करणाऱ्यांना ना हरकत दाखला नाकारला जाणार असल्याची माहिती अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Action on the violating crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.