सावधान...! आपल्या खिशात किल्ली तरीही उघडली जाते मोपेड बाईकची 'डिक्की'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:00 PM2019-09-21T15:00:45+5:302019-09-21T15:06:51+5:30
भामट्यांनी शिताफीने मोपेड दुचाकी आता ‘टार्गेट’ करण्यास सुरूवात केली आहे. महिला कुठल्याहीप्रकारे विचार न करता आपली पर्स, मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की ‘लॉक’ करतात...
नाशिक : मोपेड दुचाकींची डिक्की आपल्या खिशात ‘किल्ली’ असतानाही चोरटे विना तोडफोड करत सहजरित्या उघडू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. चोरट्यांनी अशाच पद्धतीने अॅक्टिवा दुचाकीची डिक्की उघडून सुमारे २ लाख ८२ हजार ९०० रूपयांचे दागिने भर दुपारी १२ वाजता वर्दळीच्या ठिकाणावरून हातोहात गायब केल्याची घटना घडली.
मोपेड दुचाकींचा सर्वाधिक वापर केवळ महिलांकडून केला जातो. याचा अभ्यास करून भामट्यांनी शिताफीने मोपेड दुचाकी आता ‘टार्गेट’ करण्यास सुरूवात केली आहे. महिला कुठल्याहीप्रकारे विचार न करता आपली पर्स, मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की ‘लॉक’ करतात; मात्र ही लॉक केलेली डिक्की सहज पुन्हा उघडून चोरटे मौल्यवान वस्तू गायब करत आहेत. नाशिकरोड भागात अशाच पध्दतीने चोरट्यांनी मौल्यवान दागिने लंपास केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तमंदीर स्थानकाजवळ एका बॅँकेसमोर फिर्यादी शाहरु ख सलमान पठाण (२१, रा. अंबड-लिंकरोड) या युवकाने शुक्र वारी (दि.२०) दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील एका बॅँकेपुढे मोपेड अॅक्टिवा दुचाकी (एम.एच१५ डीव्ही १३१४) उभी केली. या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. शाहरु ख हा त्याच्या कुटुंबियांसह बँकेत गेला असता चोरट्याने त्याच्या येण्याच्याअगोदरच अॅक्टिवाची डिक्की शिताफीने उघडून डिक्कीमधील २ लाख ८२ हजार ९०० रूपये किंमतीचे ७३ ग्रॅम वजानाचे मंगळसुत्र, सोन्याच्या १८ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी शाहरूख याने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही सर्व घटना येथील बॅँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या अधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत,. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.