गंगापूरला जनावरे चोरणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:08 AM2019-06-30T00:08:33+5:302019-06-30T00:08:57+5:30
गावातील नुरानी चौकात मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेले चोरटे आणि पोलिसांमध्ये थरारनाट्य घडले. मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केल्याने चोरटे चार गुरे रस्त्यातच सोडून फरार झाले.
गंगापूर : गावातील नुरानी चौकात मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेले चोरटे आणि पोलिसांमध्ये थरारनाट्य घडले. मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केल्याने चोरटे चार गुरे रस्त्यातच सोडून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून गुरांना शुद्धीवर आणले.
जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्यांना चारचाकी वाहनातून पळवून नेणारी टोळी सध्या गंगापूर भागात कार्यरत झाली असून, गावातील नुरानी चौकाजवळ असलेल्या पटांगणावर काही मोकाट जनावरे रात्रीच्या सुमारास विश्रांतीसाठी थांबतात. हीच संधी साधून शुक्रवारी पहाटे चारचाकी वाहनातून तीन ते चार जणांनी मोकळ्या मैदानात बसलेल्या मोकाट गुरांना काही तरी टोचले. सदरची बाब एका नागरिकाच्या लक्षात आली, त्याचवेळी गंगापूर पोलिसांचे गस्ती वाहनही तेथे आल्याने चोरट्यांनी वाहनासह धूम ठोकली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु चोरटे फरार झाले. दरम्यान चोरट्यांनी चार गुरांना भुलीचे इंजेक्शन टोचल्याचे लक्षात आले असता काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. आर. कुटे यांना माहिती दिली असता, डॉ. कुटे व डॉ. जे. सी. जाधव यांनी घटनास्थळी येऊन बेशुद्धावस्थेत असलेल्या गुरांना औषधोपचार करून शुद्धीवर आणले.
पशुधन वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी
यापूर्वीही कलाबाई रामदास वाघ यांची गाय व वासरू चोरीला गेले असून, पोलिसांत तक्रार देऊनही अद्याप सापडलेले नाही. त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती होताना टळली असून, या भागातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गंगापूर गावात व परिसरात भुरट्या चोºया, मोकाट गुरे (पशुधन) चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, यामागे टोळी सक्रिय झाल्याचे दिसते. त्यामुळे गंगापूर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून पुन्हा पुन्हा या घटना घडणार नाहीत.
- अॅड. सुदर्शन पाटील, गंगापूर
चारही गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्यात आले होते. चोरी करण्याच्या उद्देशानेच चोरांकडून गुरांना प्रथम गुंगीचे इंजेक्शन टोचले जाते आणि थोड्या वेळात ते त्यांची हालचाल बंद झाल्याचे पाहून त्यांना गाडीत टाकून वाहतूक करतात.
- डॉ. ए. आर. कुटे,
पशुधन विकास अधिकारी