शहरात आजपासून सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:51 AM2020-12-02T00:51:41+5:302020-12-02T00:52:01+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरुष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रित हे अभियान राबविणार आहेत.
नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरुष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रित हे अभियान राबविणार आहेत.
शहरामध्ये कुष्ठरुग्णांच्या तपासणीसाठी दहा तंत्रज्ञ, १५ टीबीएचव्ही आणि ५ एसटीएस कार्यरत आहे. शहरात अतिजोखमीचा भाग म्हणजेच झाेपडपट्ट्या आणि वीटभट्ट्या असून, याठिकाणी ही शोधमोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी आशा कर्मचारी आणि स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच महापालिकेत पार पडले. मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापुसाहेब नागरगोजे, शहर कुष्ठरोग व क्षयरोग अधिकारी डॉ.कल्पना कुटे, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक डॉ.युवराज देवरे यांनी या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सन २०१९-२०२० या कालावधीमध्ये म्हणजेच एप्रिल २०१९ ते मार्च २०२० अखेर नवीन १५२ कुष्ठरुग्ण आढळले तसेच क्षयरोगाचे ३ हजार ३५३ व एमडीआर क्षयरोगाचे १२३ रुग्ण आढळले होते. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शरीरावर न खाजवणारा, न दुखणारा बधिर डाग अथवा चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, हातापायांना बधिरता येणे, हातापायांना मुंग्या येणे, चालताना पायातून चप्पल निसटून जाणे अशी कुष्ठरोगाची तर थुंकीतून रक्त पडणे, सात दिवसापासून ताप व खोकला येणे अशाप्रकारची क्षय रोगाची लक्षणे आहेेत. त्यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जाणार आहेत.