शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:15 AM2018-06-11T02:15:33+5:302018-06-11T02:15:33+5:30

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या वेगळ्या वाटचालीबाबतच्या वावड्यांना तर पूर्णविराम दिलाच, परंतु सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा अधिक विस्तृत करीत देशपातळीवर त्याची गरज प्रतिपादित केली. शिवाय ‘हम बचेंगे भी और लढेंगे भी’ अशी गर्जनाही त्यांनी केल्याने लवकरच ते पूर्ववत राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळून गेले आहेत.

Active return sign denouncing doubt! | शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत!

शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत!

Next

किरण अग्रवाल/नाशिक
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या वेगळ्या वाटचालीबाबतच्या वावड्यांना तर पूर्णविराम दिलाच, परंतु सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा अधिक विस्तृत करीत देशपातळीवर त्याची गरज प्रतिपादित केली. शिवाय ‘हम बचेंगे भी और लढेंगे भी’ अशी गर्जनाही त्यांनी केल्याने लवकरच ते पूर्ववत राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळून गेले आहेत.
सुमारे अडीच वर्षे तुरुंगात राहून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त प्रथमच भुजबळ यांनी जाहीर सभेस संबोधित केले. त्यामुळे ते काय बोलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. भुजबळांनी या औत्सुक्याला साजेसे व आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करून त्यांच्या संबंधीच्या शंका-कुशंकांना धुडकावण्याची संधी घेतली. त्यांना अटक झाल्यानंतर पक्षाने व विशेषत: पवार यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असा सूर भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त केला जात असे, पण खुद्द भुजबळ यांनीच त्यासंबंधी स्पष्टता करून आपल्या अटक काळात पवार यांनीच कुटुंबीयांची काळजी घेतल्याचे सांगितले. त्यामुळे याबाबतीतील मळभ दूर व्हावे.
छगन भुजबळ यांच्या जामिनावर सुटकेनंतर आमदार पंकज भुजबळ आभारासाठी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले होते, तर ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनीही भुजबळांची भेट घेतली होती, त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे पुन्हा सूत जमते की काय अशी शंका घेतली जाऊ लागली होती. याच बरोबर पक्षासंबंधीच्या त्यांच्या नाराजीची शक्यता लक्षात घेऊनच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली असता त्यांनी तर चक्क भुजबळ यांना काँग्रेस पक्षात प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. परंतु पवार यांचे कार्य व त्यांचे पाठबळ स्पष्ट करुन त्यासंबंधीच्या चर्चाही भुजबळ यांनी साफ फेटाळून लावताना, उलट पक्षात राहून चुका सुधारण्याची भूमिका मांडली.
गतकाळात भुजबळ यांना राजकीय विरोध करणारे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे व त्यांचे समर्थक भुजबळांच्या सुटकेनंतर अलीकडे त्यांना भेटावयास मुंबईत गेले असता, त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय सहमतीचा मुद्दा मांडला होता. तोच मुद्दा पुण्यातील सभेत व्यापक रूपात पुढे नेत त्यांनी देशात भाजपेतर पक्षांच्या तसेच नेत्यांच्या सहमती व सोबतीची गरज प्रतिपादित करीत पवार यांच्या नेतृत्वात ते शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. खुद्द भुजबळ यांनी विविध राज्यांत समता परिषदेचे घेतलेले मेळावे व केलेले ओबीसींचे संघटन पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांची सक्रिय भूमिका राहण्याची अपेक्षाही यामुळे बळावून गेली आहे. विशेषत: ‘शेर कभी घास खाता नहीं’ व ‘बंदर बुढा हुआ तो भी गुलाटी मारना छोडता नहीं’ असे दाखलेही त्यांनी दिल्याने त्यांच्या सक्रियतेची स्पष्टता होऊन गेली आहे.
आता लक्ष नाशकातील आगमनाकडे
भुजबळ यांनी जामिनावर सुटकेनंतर प्रथमच मुंबईबाहेर पडून पुण्यातील जाहीर सभेत मार्गदर्शन केले असले तरी त्यांचे अजून नाशकात येणे झालेले नाही. त्यांना मुंबईत भेटावयास गेलेल्या अनेकांशी बोलताना त्यांनी त्यांचा मतदारसंघ येवल्यात येण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. पुण्यातील सभेत बोलतानाही त्यांनी येवल्याचा उल्लेख केला. त्यामुळे आता त्यांचे होमग्राउंड असलेल्या नाशिक व येवल्यातील आगमनाकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Active return sign denouncing doubt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.