कृषिपंप चोरणारी टोळी सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:43 PM2019-05-03T16:43:48+5:302019-05-03T16:44:02+5:30
गोदाकाठी भीतीचे वातावरण : पोलिसांकडून दुर्लक्ष
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील गिरणा काठ परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील कृषिपंप चोरणारी टोळी पुन्हा सक्र ीय झाली असून, महागडे कृषिपंप चोरीस जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दहा वर्षापासून शेतकर्यांचे महागडे कृषिपंप चोरीला जाण्याचे सत्र सरार्स सरू असून पोलीस प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पिळकोस येथील मधुकर पंडित वाघ या शेतक-याचा दोन महिन्यापूर्वी तीस हजार रु पये खर्च करून घेतलेला पाच एच.पी .चा कृषिपंप चोरटयांनी चोरुन नेला. तर मागील वर्षी याच दिवसात सुरेश जाधव यांचाही कृषिपंप व इतर साहित्य चोरीला गेले होते. याशिवाय, २० ते ३० शेतक-यांचे साहित्यही चोरीस गेले आहे. मधुकर वाघ या शेतक-याची दोन ठिकाणी शेतजमीन आहे व विहीर असून ते मळ्यात राहतात. शुक्रवारी (दि.३) सकाळी शेतकरी वाघ यांचा मुलगा दत्तूहा गिरणा नदीत काठाकडे असलेल्या विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला असता , त्यांना विहरीवरील कृषिपंप, केबल आणि इतर साहित्य चोरीला गेले असल्याचे लक्षात आल. या परिसरातून शेतातील विहारीमधून कृषिपंप चोरीला जाणे हे नित्याचे झाले असल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे . परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पुन्हा सक्र ीय झाली असल्यामुळे मळ्यात राहणारे शेतकरी ,शेतमजूर ,पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . पोलिस यंत्रणेने रात्री खेडोपाडी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे .
शेळ्यांचीही चोरी
पिळकोस परिसरात आजवर मोठ्या प्रमाणावर कृषी पंप चोरीला गेले आहेत. एका कृषिपंपची किंमत तीस हजाराच्या पुढे आहे . पाच वर्षाच्या कालावधीत पिळकोस परिसरात शेकडो शेळ्या चोरीला गेल्या असून एका शेळीची किंमत दहा हजाराच्या आसपास आहे.त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.