अभिनेते वैभव मांगले यांची नाराजी भोवली, कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक निलंबित
By संजय पाठक | Published: May 17, 2023 05:20 PM2023-05-17T17:20:40+5:302023-05-17T17:22:21+5:30
नाटकाच्या प्रयोगादरम्यान एसी बंद असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आणि नाट्यगृह सोडण्यास सुरूवात केली.
नाशिक- संज्या छाया नाटकाच्या दरम्यान एसी बंद पडल्याने अभिनेता वैभव मांगले यांनी नाशिक महापालिकेच्या कालिदास कलामंदिरांच्या व्यवस्थापनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून कलामंदिराचे व्यवस्थापक जे के कहाणे यांना निलंबित केले आहे.
नाशिक महापालिकेचे कालिदास कलामंदिरात रविवारी या नाटकाचा प्रयोग होता. त्या दरम्यान एसी बंद असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आणि नाट्यगृह सोडण्यास सुरूवात केली. त्यावेळी अभिनेते वैभव मांगले यांनी प्रेक्षकांना विनंती केली तरीही अनेक प्रेक्षक निघून गेले हेाते. गेल्या अनेक दिवसांपासून कला मंदीरातील एसी चालू बंद होत असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत या कलामंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून सुमारे आठ कोटी रूपये खर्च झाले आहे. त्यानंतर एसी चालवता येत नाही आणि देखभाल दुरूस्तीचे कंत्राट संपलेले असल्याने आणि नवीन कंत्राट काढण्यास दिरंगाई केल्याने अखेरीस महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आणि व्यवस्थापक कहाणे यांना निलंबीत केले आहे.