ऐश्वर्या राय- बच्चनने भरला नाही टॅक्स; घरी धाडली नोटीस, भरावी लागणार येवढी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:09 AM2023-01-17T11:09:46+5:302023-01-17T12:38:53+5:30

सिन्नर तहसील कार्यालयास अकृषक मालमत्ता धारकांकडून वर्षाकाठी १ कोटी ११ लाखांचा महसूल अपेक्षित आहे.

Actress Aishwarya Rai- Bachchan's notice from Sinnar tehsildar for tax evasion | ऐश्वर्या राय- बच्चनने भरला नाही टॅक्स; घरी धाडली नोटीस, भरावी लागणार येवढी रक्कम

ऐश्वर्या राय- बच्चनने भरला नाही टॅक्स; घरी धाडली नोटीस, भरावी लागणार येवढी रक्कम

googlenewsNext

- शैलेश कर्पे

सिन्नर(नाशिक): अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी सिन्नर तालुक्यात २१ हजार ९७० रुपयांचा अकृषक कर थकविल्याप्रकरणी सिन्नरच्या तहसीलदारांनी त्यांना नोटीस बजावली आहे. सिन्नरचे  तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी १२०० अकृषक मालमत्ताधारकांना नोटीसा पाठविल्या आहेत. त्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्याही समावेश आहे.

सिन्नर तहसील कार्यालयास अकृषक मालमत्ता धारकांकडून वर्षाकाठी १ कोटी ११ लाखांचा महसूल अपेक्षित आहे. त्यापैकी गेल्या वर्षीचा ६५ लाखांचा महसूल थकबाकीत आहे. मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने नोटीस अस्त्र बाहेर काढले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राॅय-बच्चन यांची तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडी येथे १ हेक्टर २२ आर जमीन डोंगराळ भागात असल्याचे या नोटीसीच्या निमित्ताने समोर आले आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुझलाॅन या कंपनीत सिनेस्टार, राजकीय नेते यांच्या जमिनी असल्याची चर्चा आहे.  

थकबाकीदारांच्या नोटिशीत बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, मेटकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, छोटाभाई जेठाभाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लिमिटेड, एल बी कुंजीर इंजिनिअर, एस के शिवराज, आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला वेंचर लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, कुकरेजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ओपी इंटरप्राईजेस कंपनी गुजरात, रामा हँडीक्राफ्ट, अल्ग्रो वेंचर्स लिमिटेड या कंपन्यांना अकृषक कर भरण्याच्या नोटीसा तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी पाठविल्या आहेत. यातील काही कंपन्यांचा कर हा चालू वर्षाचा तर काहींचा दोन ते तीन वर्षांचा थकीत आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १७४ अन्वये थकबाकीदारांना या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत नोटीसीसाठी आकारणी योग्य असलेल्या फी च्या रुपये १० इतक्या रकमेसह ही रक्कम भरली जावी, ही रक्कम भरली नाही तर त्याच्या अनुपालनात कसूर झाल्याबद्दल कसूर दाराविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १७४ अन्वये थकबाकीच्या एक चतुर्थांशापेक्षा अधिक नसेल इतक्या अतिरिक्त शास्तीसह येणे असलेल्या रकमेचा वसुली करीता कायद्यानुसार सक्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सिन्नर शहरासह तालुक्यातील १२०० मालमत्ता धारकांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Web Title: Actress Aishwarya Rai- Bachchan's notice from Sinnar tehsildar for tax evasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.