लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ ! डॉ. निखिल सैंदाणे : जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:24 PM2020-08-08T22:24:42+5:302020-08-08T22:35:33+5:30
नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीचे मशीनदेखील दाखल झाले असून, पुढील आठवड्यात प्लाझ्मा संकलनासह थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्हायरस टेस्टिंग लॅबच्या निर्जंतुकीनंतर लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीचे मशीनदेखील दाखल झाले असून, पुढील आठवड्यात प्लाझ्मा संकलनासह थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्हायरस टेस्टिंग लॅबच्या निर्जंतुकीनंतर लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली.
जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातच शासनाच्या स्वतंत्र लॅबची आवश्यकता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच उद्घाटन झालेल्या या लॅबसंदर्भात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न - लॅबच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात कधीपासून होणार? किती नमुन्यांची तपासणी होणार ?
डॉ. सैंदाणे - लॅबचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, त्याबाबतचा अहवालदेखील घेतला जाईल. त्यानंतर सोमवारपासूनच लॅबच्या प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ करण्यात येणार आहे. दररोज सुमारे १९० चाचण्यांचे अहवाल प्रारंभीचे काही दिवस घेतले जातील. त्यानंतर यंत्रणा सेट झाल्यावर आवश्यकतेनुसार २७० ते ३०० चाचण्यांचा अहवाल करणे शक्य होणार आहे.
प्रश्न - जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा संकलन आणि प्लाझ्मा थेरपीला कधीपासून प्रारंभ होईल?
डॉ. सैंदाणे - प्लाझ्मा संकलनासाठीचे एक मशीन येऊन जिल्हा रुग्णालयात सेट करण्यात आले आहे. तसेच दुसरे मशीनेखील लवकरच दाखल होणार आहे. केवळ आयसीएमआरकडून मान्यता मिळाल्यानंतर अधिकृतपणे संकलनास प्रारंभ करण्यात येईल. त्यातदेखील प्रारंभी जिल्हा रुग्णालयातून निगेटिव्ह होऊन गेलेल्या रुग्णांच्याच प्लाझ्मा संकलनावर भर दिला जाणार आहे. तसेच त्यानंतरच प्लाझ्मा थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यातच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन संकलन आणि थेरपीस प्रारंभ होऊ शकेल.
प्रश्न - जिल्ह्यात व्हेंटिलेटर आणि आॅक्सिजन व्यवस्था पुरेशी आहे असे वाटते का?
डॉ. सैंदाणे - जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी व्हेंटिलेटरची आवश्यकता पडणाºया रुग्णांची संख्या अत्यंत कमी असते. सध्या जिल्ह्यात ८० रुग्णांनाच व्हेंटिलेटर लावण्यात आलेला आहे, तर ६१० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. सध्याच्या स्थितीत तरी हे सर्व प्रमाण पुरेसे आहे. मात्र, ज्या नागरिकांना असिम्पटमॅटिक अर्थात लक्षणे नसलेला कोरोना असेल त्यांनी विनाकारण खासगी रुग्णालयांच्या जागा अडवून ठेवू नये. त्यांनी घरीच उपचार घेणे अधिक योग्य असते. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, अशा रुग्णांसाठी हॉस्पिटल्समधील व्यवस्था उपलब्ध ठेवण्याची आवश्यकता आहे.
मुलाखत - धनंजय रिसोडकर