संमेलनाच्या इव्हेंटसाठी ‘कार्यक्रम समन्वयक’च्या अनोख्या पदाची भर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:25+5:302021-02-11T04:16:25+5:30
नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनाचा व्याप आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याचे लक्षात आल्यावर संमेलनासाठी ‘कार्यक्रम समन्वयक’ या ...
नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनाचा व्याप आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याचे लक्षात आल्यावर संमेलनासाठी ‘कार्यक्रम समन्वयक’ या विशेष पदाची निर्मिती करुन त्या पदावर माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीवरुन आयोजकच कात्रीत सापडले असून आता साहित्य महामंडळ काय भूमिका घेते, त्यावरच संमेलनाचा ‘नाशिक फेस्टिव्हल’ कितपत यशस्वी होणार ते निश्चित होणार आहे.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नियुक्ती झाल्याने आयोजक लोकहितवादी संस्थेकडील कार्यकर्त्यांच्या वानवाची मूठ आपसूकच झाकली गेली. दरम्यानच्या काळात समीर भुजबळ यांनी संमेलनाच्या आयोजन, नियोजनाच्या कामात लक्ष घालण्यास प्रारंभ केल्यानंतर सारी सूत्रे झटपट हलू लागली. मात्र, साहित्य महामंडळाच्या निर्देशानुसार संमेलनाच्या कार्यात आणि व्यासपीठावर राजकीय पदाधिकारी नको, म्हणून आयोजक संस्थेने समीर भुजबळ यांना आयोजन समितीमधील कोणतेही पद दिले नव्हते. मात्र, समीर भुजबळ यांनीच नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चेने आयोजक संस्थेने संमेलनाच्या इतिहासात प्रथमच ‘कार्यक्रम समन्वयक’ या पदाची निर्मिती करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासमवेत असलेले कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि ‘नाशिक फेस्टिव्हल’ आयोजनातील त्यांचा दांडगा अनुभव संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा असला तरी त्यांच्यासाठी आयोजक संस्थेने केलेली अशी पदनिर्मिती आयोजक संस्थेलाच कात्रीत अडकवणारी ठरणार आहे.
इन्फो
आधी ‘कार्यवाह’ आता ‘निमंत्रक’
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांची ‘कार्यवाह’ पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या नावापुढे आता कार्यवाह पदाऐवजी ‘निमंत्रक’ पद लावले जात आहे. जिथे संमेलन आयोजक संस्थेच्या पदाबाबतच व्दिधा स्थिती आहे, तिथे अन्य पदांच्या वाटपातील असंतुलन हे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
इन्फो
महामंडळाच्या पेचात भर
साहित्य संमेलनाचे उद्घाटनदेखील गत वर्षापासून राजकारण्यांच्या नव्हे तर लेखकाच्या हस्ते होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली होती. तसेच संमेलनाच्या कामकाजात पदे नसलेल्या राजकीय व्यक्तींची लुडबुड चालणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, आता समीर भुजबळ यांच्या रुपाने एका अभिनव पदाची निर्मिती करुन ‘साहित्यकीय चलाखी’ करणाऱ्या आयोजक संस्थेच्या कामकाजाबाबत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील काय भूमिका घेतात, त्याकडे साहित्य रसिकांचे लक्ष लागणार आहे.