ब्रह्माकुमारी केंद्राला व्यसनमुक्त सेवा पुरस्कार
By admin | Published: March 25, 2017 10:50 PM2017-03-25T22:50:31+5:302017-03-25T22:50:47+5:30
मालेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्राला समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
मालेगाव : राज्य शासनाच्या न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्राला समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. अमरावती येथे झालेल्या भारतीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्था तसेच वैयक्तिक प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यात १६ संस्थांचा व ३५ व्यक्तींचा समावेश असतो. मालेगावच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्राला हा पुरस्कार देण्यात आला आहे. अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळ येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास समाजकल्याण मंत्री बडोले, पर्यावरण राज्यमंत्री पोटे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, मुग्धा पुणतांबेकर आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.(वार्ताहर)