शौचालयाचा खोटा दाखला जोडल्याने सरपंचपद गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 06:26 PM2019-09-10T18:26:29+5:302019-09-10T18:26:56+5:30
धार्डे दिगर : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निकाल
कळवण : तालुक्यातील धार्डे दिगर ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता धनराज जाधव यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय असल्याचा खोटा दाखला जोडल्याचे सिद्ध झाल्याने अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांनी ललिता जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द केले आहे. पर्यायाने त्यांनी सरपंचपदही गमावले आहे.
पाडगण, मोहबारी, पिंपळे खुर्द, पाटीलपाडा, धार्डेदिगर अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील सरपंच ललिता जाधव स्थनिक ठिकाणी न राहता कळवण येथे राहून मनमानी पद्धतीने कारभार करणे, अधिकाराचा गैरवापर करून शासकीय सेवेत असणारे सासरे फुलाजी रु पजी जाधव यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच ग्रामसेवकाशी संगनमत करून पाच लाखाची अफरातफर केल्याचा आरोप धार्डेदिगर येथील ग्रामस्थ दिपक सिताराम देशमुख यांनी अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे केला होता. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दोनही पक्षाची बाजू एकूण घेत ग्रामपंचायत अधिनियम १९८५ चे कलम १६ नुसार सरपंच ललिता जाधव यांचे धार्डे दिगर येथील गावातील घरातील शौचालयाचा वापर करीत नसल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द ठरविण्यात आले.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
पिंपळे खुर्द येथे एकत्र कुटुंब आहे. आमचे दोन शौचालय वापरात आहेत. अपर जिल्हाधिकाºयांनी शौचालय वापरात आहे किंवा नाही याची कुठचीही चौकशी न करता माझे विरोधात निकाल दिला आहे. मी या निर्णया विरोधात महसूल आयुक्त कार्यालय नाशिक यांचेकडे अपील दाखल केले आहे. येथील निर्णय लागल्यानंतर हेतुपुरस्कर बदनामी केल्याप्रकरणी मी संबंधितांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
- ललिता जाधव, सरपंच, धार्डे दिगर