अपर महासंचालकांची कारागृहाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:40 AM2020-09-12T01:40:13+5:302020-09-12T01:40:30+5:30
मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले.
नाशिकरोड : मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले.
रामानंद यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. सुनील रामानंद म्हणाले की, लॉकडाऊनकाळातही कारागृहातील नऊ कारखाने व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे कैद्यांना रोजगार मिळत असून, ते त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पाठवू शकत आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढला आहे. काही कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी नाशिकरोड कारागृहातील प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे कारागृहातील कर्मचारी, अधिकारी तसेच कैद्यांना कोरोना झालेला नाही हे मोठे यश आहे.
रामानंद यांनी कारागृहातील रुग्णालय, कैद्यांच्या बराकी, कारखाने यांची पाहणी केली. साने गुरुजींच्या कक्षास भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे, अधीक्षक प्रमोद वाघ, उपायुक्तविजय खरात, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, एस. आर. गायकवाड, एस. ए. गाडे, प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक सूरज बिजली आदी उपस्थित होते.