दाखल्यांसाठी जादा अधिकारी
By admin | Published: June 21, 2016 11:46 PM2016-06-21T23:46:04+5:302016-06-21T23:50:08+5:30
विद्यार्थी, पालक हैराण : प्रशासन बघ्याच्या भूमिकेत
नाशिक : सेतू केंद्रातून वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक हैराण झालेले असताना, दाखल्यांवर स्वाक्षऱ्या होत नसतील तर त्यासाठी जादा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. परंतु शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत निकट आलेली असताना, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यापेक्षा आणखी काय करू शकतो, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या दोन महिन्यांपासून सेतू केंद्राच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून, महिना उलटूनही दाखले मिळत नसल्याने सकाळपासून सेतू केंद्राबाहेर विद्यार्थी, पालकांची रिघ लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारीची दखल घेत प्रशासनाने सेतू केंद्र चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी, सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या त्रुटी दूर होत नसल्याने केंद्र चालकानेही हात टेकले आहेत. या साऱ्या गोंधळात विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत निकट आली असून, दाखल्यांसाठी त्यांची वणवण सुरू आहे. काही वेळा दाखल्यांवर अधिकारी स्वाक्षरी करीत नसल्याची तक्रार केली जाते तर काही वेळा सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असला तरी, यासाऱ्या गोष्टींशी विद्यार्थी, पालकांना काही देणे-घेणे नाही.
पालकांच्या या असहाय्यतेचा फायदा दलालांनी उचलला असून, उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी तीन हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी दाखले विलंबाने मिळतात, याविषयी आश्चर्य व्यक्त केले. सात दिवसांत पालकांना दाखले देण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगून, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीविना दाखले पडून असतील तर जादा अधिकाऱ्यांची नेमणूक करू, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)