दुसऱ्या पर्वणीसाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा
By admin | Published: September 11, 2015 12:45 AM2015-09-11T00:45:20+5:302015-09-11T00:46:01+5:30
दक्षता सुरक्षेची : एसआरपी, आरएएफ, बीएसएफच्या जवानांनी ठोकला तळ
नाशिक : येत्या रविवारी पार पडणाऱ्या कुंभपर्वणीच्या दुसऱ्या शाहीस्नानाच्या सोहळ्यासाठी शहरात सुमारे पंधरा हजारांहून अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबरोबरच राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा दल, शीघ्र कृती दल, सीमा सुरक्षा दलाचे जवान शहरात दाखल झाले आहे.
दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीसाठी शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी शहराची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहराबाहेरून आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांनी रंगीत तालीम पूर्ण करून घेतली आहे.
फेरनियोजनानुसार आपत्कालीन मार्ग, भाविक मार्ग, प्रशासकीय मार्ग, स्नानाचे घाट, नो-एन्ट्री, नो-व्हेईकल झोन आदिंची माहिती अतिरिक्त पोलीस बळाला अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. येत्या शनिवारी (दि.१२) संध्याकाळपासून शहरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या पर्वणीसाठी अंतर्गत वाहनतळ जवळ आणले असून, शहर बससेवाही बाह्य वाहनतळापासून अंतर्गत वाहनतळापर्यंत शटल बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)