मालेगावी वैद्यकीय यंत्रणेची अतिरिक्तकुमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:21 PM2020-04-24T17:21:17+5:302020-04-24T17:23:46+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आणखी १४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक शुक्रवारी मालेगावच्या मदतीला रवाना करण्यात आली आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेचे ४० आरोग्य अधिकारी मालेगावच्या दिमतीला देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात प्रथम निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा व मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता आरोग्य विभागाने कोरोनाचा एकच रुग्ण सापडल्यानंतर तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलून कोरोनावर नियंत्रण मिळविले. मात्र मालेगावी अचानक एकापाठोपाठ रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले असून, मालेगाव महापालिकेची आरोग्य व्यवस्था त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अपुरी पडत असल्याचे पाहून ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी मालेगावची परिस्थिती लक्षात घेऊन ४० वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिकांची सेवा वर्ग केली. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून या संदर्भात गुरुवारी रात्री पुन्हा १४२ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मालेगावसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यात फिजिशियन, भुलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका, आरोग्य सहायकांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने मालेगावी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.