भाजपच्या उमेदवारीतून प्रस्थापितांचा पत्ता कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:45 AM2019-11-21T00:45:41+5:302019-11-21T00:46:06+5:30
महापालिकेत प्रत्येक वर्षी काही ना काही सत्तापदे मिळवणाऱ्यांऐवजी ज्यांना काहीच पदे मिळाली नाहीत त्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर अनेक प्रस्थापित इच्छुकांचा लगोलग पत्ता कट झाला आणि ज्यांना पदे मिळाली नाहीत अशी पाच ते सहा नावे पुढे आली.
नाशिक : महापालिकेत प्रत्येक वर्षी काही ना काही सत्तापदे मिळवणाऱ्यांऐवजी ज्यांना काहीच पदे मिळाली नाहीत त्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर अनेक प्रस्थापित इच्छुकांचा लगोलग पत्ता कट झाला आणि ज्यांना पदे मिळाली नाहीत अशी पाच ते सहा नावे पुढे आली. पक्षाच्या आदेशानुसार प्रमुख इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी त्याबाबत आता गुरुवारी (दि.२१) फैसला होण्याची शक्यता आहे.
महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये यंदा प्रचंड स्पर्धा होती. स्थायी समितीचे विद्यमान सभापती उद्धव निमसे, माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके, माजी सभागृह नेते दिनकर पाटील त्याचप्रमाणे सतीश कुलकर्णी, अरुण पवार, दिनकर आढाव, शशिकांत जाधव, गटनेता जगदीश पाटील यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. पक्षातील इच्छुकांची संख्या बघता कोणाही एकाला उमेदवारी दिली तर त्याचे पडसाद उमटू शकत असल्याने सुमारे पन्नास नगरसेवकांना कोकण आणि तेथून गोवा असे नेण्यात आले होते. त्याठिकाणी मंगळवारी (दि.१९) दुपारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार सीमा हिरे हे मुंबईहून पोहोचल्यानंतर त्यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या फाटाफुटीच्या चर्चांना थारा न देता भाजपचाच महापौर होईल, असा धीर दिला. त्यानंतर सर्व नगरसेवकांची मते बंद दाराआड ऐकण्यात आली. त्यावेळी सर्वांनी ज्यांना आजवर सत्तापदे मिळाली त्यांनाच पुन्हा संधी देऊ नका अशा आशयाचे मत व्यक्त केले होते. या बैठकीनंतर महाजन गोव्याहून मुंबईला पहाटे पोहोचले. त्यानंतर अगोदरपासूनच मुंबईत पाचारण करून ठेवलेल्या इच्छुकांची बैठक घेतली आणि त्यांना पक्षाने यापूर्वी पदे दिलेल्यांना संधी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे गांगुर्डे, निमसे, आडके आणि दिनकर पाटील बाद झाले. त्यानंतर पक्षाच्या वतीने सतीश कुलकर्णी, दिनकर आढाव तसेच शशिकांत जाधव यांना महापौरपदासाठी तर भिकुबाई बागुल, अरुण पवार, गणेश गिते आणि अलका आहेर यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. पक्षाच्या निर्णयानंतर तर गोव्याला असणारे शशिकांत जाधव यांना नाशिकमध्ये तातडीने पाठविण्यात आले. यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनील बागुल यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे गणेश गिते यांनीदेखील महापौरपदासाठी अर्ज दाखल केला.
भाजपच्या या धोरणाचे कमी-अधिक प्रमाणात पडसाद उमटले असले तरी बहुतांश सर्वांनीच स्वागत केले आहे. तथापि, विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करू नये यासाठी दिनकर पाटील यांना महापौरपदाचा शब्द देऊन तो पाळण्यात तर आला नाहीच, शिवाय त्यांना प्राथमिकरीत्या साधा अर्जदेखील करण्यास सांगितले गेले नाहीत. पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवारी नाकारलेले इच्छुक महापालिकेत हजर होते.
उमेदवारीसाठी स्पर्धा, आज निर्णय शक्य
भाजपने महापौरपदासाठी आधी तीन आणि नंतर दोन जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले तसेच उपमहापौरपदासाठीदेखील एकूण चार जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले असले तरी दोन्ही पदांसाठी एकेक अंतिम उमेदवार गुरुवारीच (दि.२१) घोषित करावा लागणार आहे. कारण भाजपच्या तब्बल ६५ नगरसेवकांना पक्षादेश बजावावा लागणार आहे. त्यातच अनेक जण फुटीर असल्याने त्यांच्या घरावरदेखील चिटकावा लागणार आहे आणि वृत्तपत्रातदेखील पक्षादेशाचे प्रकटन करण्यात येणार आहे.