जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:49 PM2020-04-08T22:49:07+5:302020-04-08T22:50:27+5:30
मालेगाव शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले. दरम्यान, आयुक्तांनी शहरातील किराणा व्यापाऱ्यांसह मेडिकल व्यावसायिकांची बैठक घेऊन आढावा घेतला.
मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले. दरम्यान, आयुक्तांनी शहरातील किराणा व्यापाऱ्यांसह मेडिकल व्यावसायिकांची बैठक घेऊन आढावा घेतला.
सहायक आयुक्त तुषार आहेर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व चारही प्रभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक घेण्यात आली. शहरातील जवळपास २६ किराणा घाऊक व्यापाऱ्यांसह १९ मेडिकल घाऊक व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक झाली. बैठकीत सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बरोबर होतो का, त्याचा पुरेसा स्टॉक आहे का, औषधपुरवठा पुरेसा आहे का, मधुमेही रुग्णाला लागणारे इन्शुलीन यासारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. किराणा व्यापारी यांनी त्यांच्याकडे मुबलक साठा उपलब्ध असल्याबाबत सांगितले.
किराणा व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच सेवा देणेबाबत मनपा प्रशासनाने सूचना केली असता त्यांनी मालेगाव शहरात ही सेवा पुरविणे अशक्य असल्याचे कथन केले. प्रभाग क्र. १ ते ४ हद्दीतील किराणा व्यापारी यांनी त्यांचे कामगारांसाठी ओळखपत्र मिळण्याची मागणी केली. तर मेडिकल व किराणा व्यापारी व्यावसायिक यांनी शहरातील जागोजागी बंद असलेले रस्ते खुले करावे त्यामुळे नागरिकांना दुकानापर्यंत येण्यास अडचणी येतात अशी मागणी केली. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत प्रशासनाच्या सोबत आहे अशी ग्वाही दुकानदारांनी दिली.