ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:08 IST2021-04-20T00:07:54+5:302021-04-20T00:08:26+5:30
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे.

ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन त्वरित ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करावा, अशी अपेक्षा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील कोरोनाबाधितांवरील उपचाराच्या अनुषंगाने सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए प्रतिनिधींबरोबर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठक घेतली. यावेळी नाशिककरांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आयएमएच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
रेमडेसिविर टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर औषधांची शिफारस योग्य प्रकारे केली जात आहे किंवा कसे, हे डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासले तर अनावश्यक मागणी दूर होईल तसेच योग्य त्या रुग्णांना पुरवठा करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचा पाठपुरावा करण्याचे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये प्रबोधनाचे आश्वासनही आयएमएच्या वतीने देण्यात आले.
वैद्यकीय व्यावसायिकांना येत असलेल्या अडचणींकडे असोसिएशनने लक्ष वेधले आणि रेमडेसिविर तसेच ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाची यंत्रणा व डॉक्टरांची यंत्रणा एकत्रितरीत्या या औषधांची शिफारस, वापरण्यात तसेच वितरण या सगळ्या बाबींवर लवकरच प्रभावी नियंत्रण आणेल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी