आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:53 AM2018-03-20T00:53:53+5:302018-03-20T00:53:53+5:30
आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आडगाव : आडगाव-म्हसरूळ रस्ता अरुंद असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, लहान-मोठे अपघात पाहता या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी वाढत्या रहदारीचा विचार करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आता हा रस्तादेखील अपुरा पडत आहे. शिवाय या रस्त्यालगत अनेक शाळा, कॉलेज व प्रशासकीय कार्यालयदेखील आहे. रस्ता कमी रुंदीचा व वळणाचा असल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असतात. आडगाव-म्हसरूळ रस्त्यालगत मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेज, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस कर्मचारी वसाहत, आरोग्य विज्ञानपीठ व दिंडोरीरोडला जोडला जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस कर्मचारी व स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. पण हा रस्ता कमी रुंदीचा असल्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आडगाव परिसरातील अपूर्ण असलेले रिंगरोड जोडल्यास महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल. आडगाव-म्हसरूळ रस्त्याला जोडणारे काही रिंग रोडदेखील अपूर्ण आहेत. या परिसरातील हे संपूर्ण रिंग रोड जोडल्यास मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक गरजेच्या ठिकाणी वळवून वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे शक्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाय त्यामुळे परिसराच्या विकास होण्यास मदत होईल. आडगाव ते गिरणारे हा रस्ता पूर्वीच मंजूर करण्यात आला होता. त्यातील म्हसरूळ ते गिरणारे रस्ता पूर्ण झाला आहे. त्यानंतर रखडलेल्या आडगाव-म्हसरूळ रस्त्याचे अजूनही रुंदीकरण झाले नाही.
या रस्त्यालगत शाळा ,कॉलेजेस व प्रशासकीय कार्यालये असल्यामुळे कायम वर्दळ असते. शिवाय रस्ता वळणाचा असल्याने अनेक अपघात होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष देऊन त्वरित रुंदीकरण करण्यात यावे. - रामभाऊ जाधव, रहिवासी