नाशिकचा आडगाव ट्रक टर्मिनल ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:20 PM2018-03-30T13:20:12+5:302018-03-30T13:20:12+5:30
जकात बंदचा परिणाम
नाशिक : काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय करण्यासाठी येथे स्पर्धा असायची. लाखो रु पयांची उलाढाल होत असे पण जकात बंद झाल्यापासून आज हा परिसर ओकाबोका झालेला पहायला मिळत आहे.
रस्ते, पाणी, बांधकाम क्षेत्र व पार्किंगसाठी प्रशस्त जागा आणि मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या या वास्तुचा पर्यायी वापर करणे गरजेचे असल्याचे मत आता येथील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भव्य वास्तुचा सुयोग्य वापर करावा जेणेकरून येथील विकासाला चालना मिळेल व रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. आज ट्रक टर्मिनलच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बस्तान बसवले असून, ट्रान्सपोर्टनगर म्हणूनच एक वेगळी ओळख तयार झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक गाड्यांचीदेखील नेहमीच वर्दळ असते. ट्रान्सपोर्ट व्यवसायाला पूरक व्यवसायासाठी या ट्रक टर्मिनलचा वापर होऊ शकतो.
याशिवाय शहर परिसरात महामार्गाजवळ असलेले गॅरेज, वर्कशॉप व्यावसायिकांना या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केल्यास महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल आणि व्यवसायवृद्धीला फायदा होईल. याशिवाय महामार्गावर सर्व्हिस रोडवर अनेक ट्रान्सपोर्ट व गॅरेज व्यावसायिकांमुळे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या व्यासायिकांना त्याठिकाणी सोयीची जागा उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल.