शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकार असंवेदनशील - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 06:06 PM2022-10-27T18:06:25+5:302022-10-27T18:06:59+5:30
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकार संवेदनहीन असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
(शैलेश कर्पे)
सिन्नर (नाशिक) : राज्यभरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात राज्य सरकार संवेदनहीन असल्याचा आरोप माजी पर्यटन मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्याप्रसंगी सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे त्यांनी व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पाहणी केली. त्यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीकास्त्र सोडले. दीपावलीनिमित्त रेशन दुकानाद्वारे वितरित केलेल्या दिवाळी किटचे टेंडर दर पाहा, यात मोठ्या घोटाळ्याची संभावना असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्याचे कृषिमंत्री कुठेही दिसत नसल्याचे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा कुठेही पोहोचलेली नाही. तसेच घटनाबाह्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी दिसत नाही. शेतकऱ्यांना अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. हे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मदतीसाठी आमच्या हातात काही नसले तरी विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांसोबत आम्ही असल्याचे ते म्हणाले. आपण सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी असे ते म्हणाले. या सगळ्यात शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. अतिवृष्टी होत असल्याने वातावरण बदलाचा परिणाम व त्यावर काम होणे गरजेचे आहे ते आम्ही करत होतो असे ते म्हणाले.
शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात पाहणी केली. समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सचिन आहिर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदि उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"